| रत्नागिरी | प्रतिनिधी |
‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे चित्र बदलणार असून आम्ही 24 तास काम करतोय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात मशासन आपल्या दारीफ या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ ते बोलत होते. या निमित्तानं त्यांनी रत्नागिरीत विविध शासकीय योजनेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. शिंदे यांचा हा तिसरा रत्नागिरी दौरा होता.
रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रंही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला मदत करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतल्या नऊ तालुक्यांमधून दहा हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित होते. नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा शासन आपल्या दारी या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. यासाठी सुमारे 75,000 स्थानिकांना लाभ वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनांना त्यांच्या संबंधित भागात दोन दिवसीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एसटीच्या 100 फेऱ्या रद्द
शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी चिपळूण आगारातील 50 एसटी आरक्षित करण्यात आल्यामुळे चिपळूण आगारातील शंभरहून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. चिपळूण तालुक्यातून अडीच हजार लोकांना एसटीने रत्नागिरीत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दौरा मुख्यमंत्र्यांचा आणि त्रास सामान्यांना अशी स्थिती दिसत होती.