एमएसआरडीसीचे अक्षम्य दुर्लक्ष
| पाली | वार्ताहर |
पाली-खोपोली राज्य महामार्गावर (548 अ) दिवसागणिक अपघाताच्या संखेत वाढ होत आहे. हा महामार्ग अनेक ठिकाणी अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या मार्गावर शेमडी तुकसई हद्दीत रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला असून, हा खड्डा अपघातला आमंत्रण देत आहे. या महामार्गाची जबाबदारी असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी मात्र या अपघाती क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
ऐन सुट्टीच्या दिवसात रस्त्यावरून वाहनांची रेलचेल वाढल्याने खड्डा अचानक दिसून येत नाही मात्र या खड्ड्यात वाहने जोरात आपटली जात आहेत. तर मोटारसायकल खड्ड्यात आदळून मोटारसायकस्वार पडत आहेत. हा खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनांचे अपघात होत आहेत. तर खड्ड्यात आदळून वाहनांचे टायर फुटत आहेत.
या महामार्गावरून प्रवास करताना अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कारगाव ते तुकसई शेमडी दरम्यान अपघाती क्षेत्र वाढली आहेत. निमुळता रस्ता, वळणावळणाचा रस्ता, चढ उताराचा रस्ता असल्यामुळे बेदरकारपणे वेगात आलेली वाहने दिसून येत नाहीत परिणामी अपघात होतात. दिवसागणिक या मार्गावर अपघात होत आहेत.नुकतेच काही दिवसांपूर्वी शेमडी गावच्या हद्दीत वळणावर दोन तरुण युवकांना आपला जीव गमवावा लागला. या अगोदरदेखील जीव गमावल्यामुळे कित्तेक घरे उजाडली आहेत. निमुळता रस्ता, अवजड वाहनांची गर्दी, वळणे, महामार्गावर अपुर्या सुविधा, खड्डे, खडतर रस्ते, महामार्गांवर दिशादर्शक फलकांचा अभाव, महामार्गालगत नसलेली विजेची कमतरता अशा अनेक भेडसावणार्या समस्यांकडे एमएसआरडीसीच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
रात्रीच्या वेळी प्रवास करताना वळणावर समोरून आलेले वाहन दिसत नाही. दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याकारणाने वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवितात. बरेच दिवसांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे खड्डा चुकविताना वाहने अंगावर येतात.
– मनोज साळुंखे, प्रवासी.