। अलिबाग । प्रतिनिधी ।
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी गुरुवारी (दि.25) अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील गट साधन केंद्र, नवगाव, झिराड, वायशेत व कुरुळ येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेच्या कामकाजाची माहिती घेत शैक्षणिक गुणवत्तेचीदेखील पाहणी केली. दरम्यान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी प्रकल्प संचालक सिध्देश वाडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाले, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी सुनिता चांदोरकर, सूनील भोपाळे, संतोष शेडगे, विस्ता अधिकारी कल्पना काकडे, डी.एल. साळावकर, अलिबागचे गट शिक्षणाधिकारी, कृष्णा पिंगळा, केंद्र प्रमुख प्रमोद भोपी, कृष्णकुमार शेळके, संजय पाटील, विकास पाटील, विनायक पाटील, संजय पोईलकर, समग्र शिक्षा सर्व कर्मचारी उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड, रायगड जिल्हा परिषद शाळा नवगाव, रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा वायशेत, रायगड जिल्हा परिषद शाळा कुरुळ, गट साधन केंद्र कुरुळ येथील आयसीटी लॅबची पाहणी केली. पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या अध्ययन समृद्धी पेटी व त्यातील साहित्य किती शाळा आणि विद्यार्थी अध्यापनात वापर करतात या अंतर्गत विचारणादेखील करण्यात आली. तसेच, रोबोटिक किड्स, जादुई पेटारा, सायन्स लॅब, व्हर्च्युअल क्लासरूम, स्मार्ट क्लास, आदी उपक्रम, वॉल कंपाऊंड, क्रीडा साहित्य इत्यादी विषयी माहिती घेऊन विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यात येणार्या अडचणी जाणून घेतल्या.