| नेरळ | प्रतिनिधी |
खांडस ग्रामपंचायतमधील विविध भागात विजेची समस्या दूर करण्यासाठी विविध ठिकाणी 28 विजेचे खांब येवून पडले होते. त्यापैकी काही खांब उभे करण्यात आले आहेत. 2020मध्ये उभे करण्यात आलेल्या विजेच्या खांबांवर अद्याप विजेच्या तारा बसवून वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. दरम्यान,ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी महावितरण कार्यालयात येवून 15 दिवसात समस्या सुटली नाही तर मात्र 12 जून पासून उपोषण करण्याचा इशारा लेखी निवेदन देवून केला आहे.
तीन वर्षापूर्वी विजेचे खांब मंजूर होऊन ते खांब खांडस ग्रामपंचायत मध्ये पोहचले.त्यातील निम्म्याहून अधिक विजेचे खांब उभे केले असून महावितरण कडून अर्धे विजेचे खांब हे अजूनही जमिनीवर पडून आहेत. कार्यालयाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे जमिनीवर पडून राहिल्यामुळे पाऊस, उन यामुळे ते गंजलेले तसेच सडलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे सदर काम अपुर्ण राहिल्यामुळे त्यातील अनेक विजेच्या खांबांची दुरवस्था झाली आहे.तर जे विजेचे खांब जमिनीवर उभे करण्यात आले,त्या खांबांवर महावितरण कडून वीज वाहिनी जोडल्या नाहीत आणि त्यामुळे ग्रामपंचायत मधील काही भागात विजेअभावी अंधार पसरला आहे.
खांडस ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सरपंच मंगल ऐनकर यांनी महावितरण कार्यालयाकडे अनेकदा संपर्क केला.सदर समस्येची माहिती मिळूनही आपल्या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. प्रत्येकवेळी खोटी आश्वासने देऊन अधिकारी वर्गाने ग्रुप ग्रामपंचायत खांडसमधील नागरिकांची दिशाभूल केली आहे. सदर खांडस ग्रामस्थांच्या विजेच्या समस्येची दखल घेऊन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी राज्याचे तत्कालीन ऊर्जा मंत्री राज्यमंत्री नितीन राऊत यांना पत्रव्यवहार केला होता.मात्र महावितरण कडून अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे आता ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार महावितरण कंपनीला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून तरी देखील विजेच्या खांबांवर वीज वाहिन्या जोडून वीज पुरवठा सुरू झाला नाही तर मात्र खांडस ग्रामस्थ तेथील ग्रामपंचायत सरपंच मंगल ऐनकर यांच्या नेतृतवाखाली 12 जून पासून उपोषण सुरू करणार आहे.अशा आशयाचे निवेदन 24 मे रोजी महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले. त्यावेळी सुरेश भोळे, दाजी ऐनकर, पुंडलिक ऐनकर, रवींद्र ऐनकर, अनिल पाटील, जीवन ऐनकर, शंकर ऐनकर, विलास माळी, दिलीप ऐनकर, पुंडलिक ऐनकर, जनाबाई ऐनकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.