| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वैभव सूर्यवंशीने अगदी कमी वयात आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर त्याला भारतीय टी-20 संघातही संधी मिळाली होती. आता त्याची नजर लाल चेंडूच्या क्रिकेटवर आहे. मात्र, वैभवच्या टेस्ट क्रिकेटच्या स्वप्नासमोर एक मोठी अडचण असल्याचे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे. त्यांच्या मते, वैभवमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता नक्कीच आहे. मात्र, त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल चेंडूचे पुरेसे सामने खेळता येतील का, हा मोठा प्रश्न आहे. वैभवच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय आणि व्हाईट-बॉल क्रिकेटच्या वेळापत्रकामुळे त्याला रणजी ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये सलग दोन पूर्ण हंगाम खेळणे कठीण होऊ शकते. त्यांच्या मते, सध्या वैभव फक्त 15 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्यावर लगेच मोठ्या अपेक्षांचे ओझे टाकण्यापेक्षा त्याला वेळ देणे गरजेचे आहे. पुढे ते म्हणाले की, वैभवला देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल चेंडूने काही हंगाम खेळण्याची संधी मिळाली, तर त्याच्यात भारतीय टेस्ट संघात स्थान मिळवण्याची क्षमता आहे. मात्र, आधीपासून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याला अंतिम संघात स्थान मिळवता येईल का, हा वेगळा मुद्दा आहे. सगळ्यात मोठी अडचण त्याच्या वेळापत्रकाची आहे. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी खेळताना तो व्यस्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत लाल चेंडूचे दोन पूर्ण हंगाम त्याला खेळता येतील की नाही, याबाबत द्रविड यांनी शंका व्यक्त केली आहे.







