। माथेरान । संतोष खाडे ।
माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरान येथील वीर हुतात्मा भाई क्रीडा संकुल येथे शनिवार (दि.28) आणि रविवार (दि.29) असे दोन दिवस अश्वशर्यतींचा थरार पर्यटकांना आणि माथेरानकरांना अनुभवता येणार आहे.
माथेरान हे जागतिक दर्जाचे सुंदर पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या पर्यटनस्थळाला आवर्जून भेट देतात. येथील सुंदर निसर्गाबरोबरच हॉर्स रायडिंग हे सुद्धा येथील प्रमुख आकर्षण आहे. माथेरानमध्ये अनेक अश्वप्रेमी हॉर्स रायडिंगचे धडे घेण्यासाठी येथे येतात. या नवोदित घोडे स्वारांसाठी होणार्या शर्यती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच असते. दरवर्षी मे महिन्यात माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना आणि येथील नागरिकांसाठी प्रत्येक वर्षी येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात वार्षिक सार्वजनिक खेळांचे आयोजन करण्यात येते. यावेळी माथेरान नगरपरिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे येथे घोड्यांच्या शर्यती असतात. तसेच आदीवासी बांधवांसाठी येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनेक स्पर्धा घेण्यात येतात.
मे महिन्यातील शेवटच्या विकेंडमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माथेरानमध्ये पर्यटक संख्या देखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पर्यटकांना देखील याचा आनंद घेता येणार आहे. काही पर्यटक तर दरवर्षी या इव्हेंटसाठी, अश्वशर्यतीत भाग घेण्यासाठी येथील हॉटेल्समध्ये अॅडव्हान्स बुकिंग करून आवर्जून येतात. या सर्व इव्हेंटची जबाबदारी माथेरान युथ सोशल क्लबचे अध्यक्ष प्रशाम दिवाडकर आणि माजी नगरसेवक संदिप शिंदे यांच्याकडे आहे. दरवर्षी होणार्या या इव्हेंटमुळे माथेरान पर्यटनात अधिक भर पडते आणि येथील व्यवसाय देखील अधिक वृद्धिंगत होतो. यामुळे माथेरानकर देखील या इव्हेंट मध्ये आनंदाने सहभागी होतात.
या स्पर्धांचा समावेश
गॅलपिंग, ट्रॉटिंग, मुजिकल बॉल अँड बकेट, सडलिंग युअर हॉर्स, टग ऑफ वॉर, गॅलपिंग गोल्फ ऑन हॉर्सबॅक
म्युझिकल मग्स ऑन हॉर्सबॅक, टॅट पेंगिंग तसेच येथील आदिवासी बांधवांसाठी धावण्याची शर्यत लहान मुलांसाठी सॅक रेस, मुले आणि मुली यांच्यासाठी फ्लॅट रेस आणि पर्यटकांसाठी रिले रेस
या साहसी खेळांमुळे माथेरान पर्यटनात नक्कीच वाढ होते. येथे येणार्या पर्यटकांना देखील यात सामील होता येते. पालिकेच्या माध्यमातून आम्ही जो प्रेयत्न केला तो आजही पुढे जात आहे. नवोदित मुलांना आपली कसब दाखविण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार केला आहे.
प्रसाद सावंत, माजी नगरसेवक
आम्ही अश्वशर्यतींचा थरार अनुभवण्यासाठी दरवर्षी येथे येतो. माथेरानमध्ये माझे सुद्धा स्वतःचे घोडे आहेत. यामुळे या मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होणार्या या शर्यतींसाठी मी वेळात वेळ काढून आवर्जून येईन.
हितेश शहा, अश्वमालक मुंबई
माथेरान येथील युथ सोशल क्लबच्या माध्यमातून मागील पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्षे या अश्वशर्यतींचे आयोजन केले जात आहे. या क्लबचे संस्थापक – संचालक प्रदिप दिवाडकर यांनी माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी या शर्यतींचे आयोजन केले होते. आम्ही हे आयोजन असेच पुढे करीत राहणार आहोत.
प्रशाम दिवाडकर, अध्यक्ष माथेरान युथ सोशल क्लब
मागील वीस वर्षांपासून खास अश्वशर्यतींच्या स्पर्धेसाठी माथेरानमध्ये येतो. माझे येथे स्वतःचे घोडे सुद्धा आहेत. मे महिन्याच्या शेवटी येथे पर्यटक जास्त प्रमाणात असल्याने मी माझ्या रूमची अॅडव्हान्स बुकिंग करून येत असतो. ही स्पर्धा अतिशय देखण्या स्वरूपात असते. यावर्षी पहिल्यांदा मी माझ्या कुटुंबाच्या वतीने विजेत्या अश्वांना पारितोषिक देणार आहे.
करण सांघवी, पर्यटक तथा अश्वमालक मुंबई दादर