| नेरळ | वार्ताहर |
नेरळ ग्रामपंचायतच्या मालकीच्या राजमाता जिजामाता भोसले तलावातील मातीचा गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी तलावातील गाळ काढून तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. दरम्यान, मागील वर्षी या तलावाचे शुशोभीकरण करण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले होते, मात्र त्यावेळी तलावातील गाळ काढण्यात आला नव्हता.
राजमाता जिजामाता तलावाची दुरुस्ती श्री नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठानकडून काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यावेळी श्री सदस्यांकडून चांगल्या पध्यतीने गाळ काढण्याचे आणि तलावातील पाण्याची गळती थांबविण्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल दोनवेळा तलावातील गाळ काढण्याचे काम होत आहे. गाळ काढण्याचे काम जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून सुरु असून त्याचा सर्व आर्थिक भुर्दंड नेरळ ग्रामपंचायतवर येऊन पडला आहे. सध्या तलावातील सर्व गाळ काढण्यात आला असून त्या ठिकाणी साठून राहणारे पाणी जमिनीत झिरपू नये यासाठी तलावाच्याकडेने दगडी पीचींग करण्यासाठी दगड आणून टाकण्यात आले आहेत. त्या कामाचा फायदा राजमाता जिजामाता तलावाची भूजल क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. यापूर्वी गाळ काढण्याचे काम चांगल्या पद्धतीने झाले असते तर कदाचित यावेळी गाळ काढावा लागला नसता आणि नेरळ ग्रामपंचायतीमधील आर्थिक नुकसान सहन करावे लागले नसते.