| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघाने आता आपले लक्ष आयपीएलमधून विश्व कसोटी अजिंक्यपदाकडे वळवले आहे. आयपीएलमधून बाहेर गेलेल्या सहा संघांचे खेळाडू मंगळवारी इंग्लंडला रवाना झाले आहेत. निवडलेल्या संघाची पहिली तुकडी रवाना झाली असून त्यानंतर दुसरी तुकडी जाणार आहे. दरम्यान आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसर्याच दिवशी म्हणजे 29 मे रोजी उर्वरित खेळाडू देखील इंग्लंडला रवाना होतील.
विश्व कसोटी अजिंक्यपदाचाअंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे 7 जूनपासून खेळल्या जाणार आहे. याआधी भारतीय संघएक सराव सामना खेळणार होती, जेणेकरुन टी-20 मधील खेळाडूंना कसोटीच्या वातावरणाशी जुळवून घेता येईल. मात्र आता भारतीय संघ कोणताही सराव सामना खेळू शकणार नसल्याचे कळत आहे. 29 मे रोजी इंग्लंडला रवाना होणारे खेळाडू दि. 30 मे पर्यंत तेथे पोहोचतील. 1 ते 7 जून दरम्यान किमान काही दिवस सराव सामने खेळण्यासाठी संघाला पुरेसा वेळ मिळणार नाही. विश्व कसोटीपूर्वी कौंटी संघाविरुद्ध तीन दिवसीय सामना खेळण्याची संधी मिळावी, अशी बीसीसीआयची योजना होती.
इंग्लिश कौंटी स्पर्धेचा मोसम सुरू असल्यामुळे भारताला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी सराव सामना मिळणार नाही. अशा परिस्थितीतही कौंटी संघांनी जरी खेळण्याची तयारी दर्शवली तरी तो संघ दुय्यम श्रेणीचा असेल. कोणताही कौंटी संघ अव्वल खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची परवानगी देणार नाही. त्यामुळे कमकवुत संघाबरोबर खेळून आवश्यक असलेला सराव आपल्या संघाला मिळणार नाही.
चेतेश्वर पुजारा हा एकमेव फलंदाज आहे, ज्याची आयपीएलमध्ये निवड झाली नाही. त्यानंतर तो थेट कौंटी संघाकडून खेळत आहे आणि त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआय सराव सामन्याचे आयोजन करू शकेल की केवळ अंतिम फेरीपर्यंत जाईल हे पाहावे लागेल.
अंतिम सामन्यासाठीचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन.