। रायगड । प्रतिनिधी ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत निकष सुधारुन विहीर, वीज जोडणी, पंपसंच आदींसाठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसुचित जाती, जमातींच्या शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावणे हा उद्देश समोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनांतून शेतकर्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच आदी विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येते. सन 2024-25 आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांना घटकांच्या अनुदानात वाढीव लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये योजनेतंर्गत विहीरींचा लाभ घेणार्या शेतकर्यांना आता 4लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. इतर बाबीसाठी दुप्पट अनुदान वाढविले आहे. त्यामध्ये विहीर दुरुस्ती 1 लाख, सतत प्लास्टीक अस्तरीकरण रु. 2 लाख, इनवेल बोअर रु. 40 हजार, वीज जोडणी आकार रु. 20 हजार, पंपसंच रु. 40 हजार, तुषार सिंचन रु. 47 हजार, ठिबक सिंचन रु. 97 हजार यंत्रसामुग्री रु. 50 हजार, पिकीसी/एचडीपीई पाईप रु. 50 हजार, परसबागेसाठी रु. 5 हजार, विंधन विहिरींसाठी रु. 50 हजार अनुदान केले आहे.
त्यामध्ये पूर्वी असलेली रु. 1,50,000 उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे व नवीन विहीरींसाठी असणारी 12 मी खोलीची व दोन सिंचन विहिरीमधील 500 फूट अंतराची अटसुद्धा रद्द करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणार्या शेतकर्यांचे पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत जसे अर्जदार अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनुसुचित जराती प्रवर्गातील असावा. त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक आहे. जमीनधारणा 0.40 हे, ते 6.00 हे. पर्यंत मर्यादित असावी.
शेतकर्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Login या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. सदर योजनेतंर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकृतीपासून लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची सुविधा पोर्टलद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एकत्रित संगणकिय सोडत पद्धतीने लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेतकर्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बास्टेवाड यांनी केले आहे.