भात उत्पादनात 30 टक्के घट?

उशिरा पडलेल्या आणि गायब झालेल्या पावसाचा फटका; गतवर्षीच्या तुलनेत भात लागवडीचे क्षेत्र 12 हजार 899 हेक्टरने घटले

| रायगड | प्रमोद जाधव |

यंदा उशिरा पडलेल्या आणि ऐन हंगामात गायब झालेल्या पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील भातपिकांना बसला आहे. बहरलेल्या भातपिकांना सध्या पावसाची नितांत गरज असताना पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. शेतजमिनीला भेगा पडू लागल्या असून, पिके संकटात सापडली आहेत. या कालावधीत पावसाचा खंड पडल्यास भाताच्या उत्पादनात साधारणपणे 20 ते 30 टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

सात जूनला पडणाऱ्या पावसाने यंदा तब्बल 15 दिवस उशिराने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावून गेला आणि भात पेरणीची लगबग सुरू झाली. मात्र, त्यानंतरच्या पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. 22 जूनपासून सुरू झालेला पाऊस आठ जुलैपर्यंत सुरू राहिल्याने भात पेरणीवर मोठा परिणाम झाला. जिल्ह्यातील दहा हजार 524 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 24 हजार 947 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. यातील काही शेतकऱ्यांनी स्वतःला सावरत दुबार पेरणी केली.

जिल्ह्यातील पिकाखालील असलेल्या 87 हजार 536 हेक्टर क्षेत्रापैकी 61 हजार 101 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. गतवर्षी साधारणपणे 74 हजार हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड झाली होती. यावर्षी भातपिकाच्या लागवडीत 12 हजार 899 हेक्टरने घट झाल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस पडला. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम जिल्ह्यातील डोंगर भागासह पठारावरील भातपिकांवर झाला आहे. पावसाअभावी भातपिके पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली असून, शेतांमध्ये पाणी नसल्याने काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भातपीक मोठ्या संकटात सापडले आहे.

सप्टेंबर महिना संपून आता ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. या आठवड्यात पाऊस पडल्यास भातपिके व्यवस्थित राहू शकतात, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, पावसात पुन्हा खंड पडल्यास भात उत्पादनात 20 ते 30 टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी भातपिकाला कणश्या येऊ लागल्या आहेत, तर काही ठिकाणी भातपीक बहरले आहे. मात्र, या अवस्थेत पाऊस न पडल्यास त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिंता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहिला. त्याचा परिणाम भात पेरणीवर झाला. भात पिकांसह नाचणी व इतर पिकांचेही नुकसान झाले. एक हजार 219 गावांमधील 24 हजार 947 शेतकऱ्यांना फटका बसला. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्त पंचनामे केले. त्यामध्ये दहा हजार 524 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, भरपाई म्हणून नऊ कोटी 27 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

पाऊस यंदा उशिरा पडला. मात्र, तो पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहिल्याने त्याचा परिणाम भात पेरणीवर झाला. दहा हजारहून अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 24 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविला आहे. शासनाकडून नऊ कोटी 27 लाख रुपयांचा निधी येणे अपेक्षित आहे. डोंगर भागातील वरकस भागात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. आठवड्यात पाऊस पडल्यास पिके चांगली राहतील. अन्यथा पावसाचा खंड पडल्यास भातासह इतर पिकांच्या उत्पादनात 20 ते 30 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

प्रवीण थिगळे,
उपसंचालक, कृषी विभाग
Exit mobile version