आंबा काढणी, पॅकींग करण्यासाठी कामगारांची लगबग
| अलिबाग | प्रमोद जाधव |
दुसर्या भारातील रायगडचा आंबा गेल्या दहा दिवसापासून नवी मुंबईच्या बाजारात दाखल झाला आहे. दर दिवशी चार हजार पेट्या बाजारात पाठविल्या जात आहेत. आंबे काढण्यापासून खोक्यांमध्येे भरणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यामध्ये मजूरकर मग्न आहेत. या कामांतून हजारो हातांना काम मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यामध्ये 14 हजार हेक्टर क्षेत्र आंब्याचे असून 12 हजार 500 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. एक लाखापेक्षा अधिक शेतकरी आंब्याची लागवड करून उत्पादनातून आर्थिक बळ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून दुसर्या भारातील आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा येथील हापूस आंबा नवी मुंबई येथील बाजारात पाठविण्यासाठी आंबा उत्पादक शेतकरी कामाला लागले आहेत. जिल्ह्याभरातून दर दिवशी दोन डझनच्या चार हजार पेट्या बाजारात पाठविल्या जात आहेत.
आंबा काढणीपासून कागदी खोक्यांमध्ये भरणे. त्यानंतर त्यांची योग्य पध्दतीने पॅकींग करून नवी मुंबईच्या बाजारात पाठविण्यासाठी गावागावात कामगारांना काम मिळू लागले आहे. पाचशे रुपयांच्या मजुरीवर कामगार काम करीत आहेत. जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कामगारांना यातून रोजगार मिळत असल्याचे आंबा उत्पादक शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम कामगारांना मिळणार असल्याने गावातल्या गावात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

जिल्ह्यातील आंबा बाजारात दाखल झाला असताना वडोदर, जुनागड येथील केशर आंबा, कर्नाटकी, गावठी, उत्तर प्रदेशमधील दशेरी आणि लालबाग बदामी आंबादेखील बाजारात दाखल झाला आहे. त्याचा परिणाम रायगडमधील हापूसच्या किंमतीवर झाला आहे. 1500 ते 1600 रुपयांनी जाणारा आंबा एक हजार ते 1200 रुपयांनी आंबा विकण्याची वेळ रायगडच्या आंबा उत्पादकांवर आली आहे. आंब्याच्या किंमतीमध्ये घट झाल्याने एक पेटीमागे दोन ते पाचशे रुपयांची घसरण झाली आहे.