वन अधिकाऱ्यांनी माळशेज जंगलात केली रवानगी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक क्षेत्रात गवा असल्याची माहिती वनविभागाला रविवारी (दि.20) मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाने पुण्यातील रेस्क्यू या संस्थेची मदत घेऊन औद्योगिक क्षेत्रात शिरलेल्या गव्याची सुटका करून त्याला सुरक्षितरित्या भीमाशंकर वन्यजीव अभय आरण्यात सोडले असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील अनेक भागातील मानवी वस्तीत अनेकदा गवे घुसल्याचे पाहायला मिळाले आहे. पनवेलमधील शिरवली रिटघर या गावांमध्ये काही महिन्यांपूर्वी गव्याचे दर्शन झाले आहे. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रात या पूर्वी गवा दिसल्याची नोंद नसल्याने रविवारी रेस्क्यू करण्यात आलेला गवा आणि या पूर्वी दर्शन झालेला गवा एकच असण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी औद्योगिक क्षेत्रात गवा असल्याची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर गवा असलेल्या परिसराची पाहणी करून या भागातून गाव्याची सुरक्षितरित्या सुटका कशी करता या बाबत वेगवेगळ्या प्लॅनची आखनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.या वेळी गव्याच्या सुटकेसाठी पुण्यावरून बोलावण्यात आलेल्या रेस्क्यू या संस्थेच्या सदस्यांची टीम देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत होती.
अलिबागचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक संजय वाघमोडे,पनवेलचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे, वन कर्मचारी तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या संस्थेचे तुहिन सातारकर, किरण रहाळकर, अमित तोडकर, डॉ. कल्याणी ठाकूर, डॉ. निकिता मेहता, हर्षद नागरे, सायली पिलाने, तय्यब सय्यद, आयुष पाटील तळोजातील गव्याचे रेस्क्यू करण्यात आले.
अशी केली सुटका
वनविभागाने परिसरात केलेल्या पाहणी केली.या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनि संपूर्ण परिसर खाली केला होता. या नंतर गवा परिसरात असलेल्या एका रिकाम्या गोदमात जाईल असे प्रयत्न करण्यात आले. गवा गोदामत घुसल्या नंतर गोदामाच्या दरवाजावर एक कंटेनर असलेला टेम्पो लावण्यात आला. कंटेनरमध्ये गवताचा चारा टाकून गव्याला कंटेनर च्या दिशेने हाकण्यात आले. कंटेनर बाहेर टाकण्यात आलेल्या रॅम्पवरुंन गवा सुरक्षित रित्या कंटेनरमध्ये शिरताच कंटेनरचे दार बंद करण्यात आले. या नंतर वन विभागाची टीम आणि रेस्क्यूची टीम गवा असलेल्या टेम्पो सोबत भीमाशंकर वन्य जीव अभय आरण्या कडे रवाना झाली आणि भीमाशंकर वन्य जीव अभय आरण्यात या गव्या ची सुटका करण्यात आली.