ट्रॅव्हल्सची दोन गाड्यांना धडक

| चिपळूण | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर कोंडमळा सिमेचीवाडीजवळ शुक्रवारी (दि.23) सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या माणिक ट्रॅव्हल्स या गाडीने पाठीमागून कविता ट्रॅव्हल्स या आयशर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी कविता ट्रॅव्हल्सचे चालक रामेश्वर कराड (30) यांनी चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रामेश्वर कराड हे आपल्या ताब्यातील गाडीतून प्रवाशांना घेऊन बोरिवली ते गणपतीपुळे (रत्नागिरी) जात होते. पहाटेच्या सुमारास त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली असताना, मुंबई बाजुकडून गोवा बाजूकडे जाणाऱ्या माणिक ट्रॅव्हल्सच्या अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमी प्रवाशांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. माणिक ट्रॅव्हल्सच्या फरार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Exit mobile version