| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अवघ्या 21 व्या वयात देशसेवेसाठी शहीद होणारे अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील निलेश तुणतुणे यांचा स्मृतिदिन शनिवारी (दि.1) साजरा करण्यात आला. निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी लेझीम पथकाद्वारे अगळीवेगळी मानवंदना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली.
शहीद निलेश तुणतुणे ट्रस्ट व पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विदयमाने 28 वा स्मृती दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल राहूल माने, शहीद निलेश तुणतुणे ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या सदस्या अंजली ठाकूर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा अलिबाग पंचायत समितीचे सदस्य संतोष निगडे, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, नारायण तुणतूणे, निर्मला तुणतुणे, बेलोशीचे माजी सरपंच कृष्णा भोपी, ॲड. के.डी. पाटील,आदी मान्यवरांसह, माजी सैनिक, स्काऊडचे विद्यार्थी, सहाणगोठीमधील ग्रामस्थ,महिला, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारगिल युध्दात शहीद झालेले सहाणगोठी येथील शहीद निलेश तुणतुणे यांचा स्मृतिदिन सहाणगोठी येथे भव्यदिव्य कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. माजी सैनिक, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक व पोलीस विभागाकडून तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र, पुप्षहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. सुरुवातीला रायगड पोलीस व स्काऊड गाईडच्या वतीने संचलन करण्यात आले. यावेळी खानाव येथील जिल्हा परिषद शाळेसह खानाव शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांमधून नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर लेझीम पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी शहीद तुणतुणे यांच्या कार्याची माहिती दिली.
शहीद निलेश तुणतुणे यांना मानवंदना
