| अलिबाग | प्रमोद जाधव |
कुठल्याही कार्यालयात धक्के न खाता, पायपीट न करता, घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टलच्या ( एनव्हीएसपी ) माध्यमातून मतदार नोंदणी करण्याची सेवा सुरु झाली आहे. या आधुनिकतेचा अधार घेत रायगड जिल्ह्यातील असंख्य मतदारांनी मतदान नोंदणी ऑनलाईन करण्यावर भर दिला असून जिल्ह्यातील दोन हजार 660 जणांनी नोंदणी केल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
मतदान ओळखपत्रामध्ये अनेकवेळा चुका असतात. त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी तहसील कार्यालयासह स्थानिक पातळीवर बीएलओमार्फत करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू वेळेवर मतदान ओळखपत्र मिळण्याच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारी कायमच्या सोडविण्यासाठी निवडणूक विभागाने आधुनिकतेचा व सोशल मिडियाचा अधार घेत घरबसल्या मतदान कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी करणे. वयाचा पुरावा जोडणे. मतदान कार्डमध्ये नाव आहे, की नाही. तपासणे ही प्रक्रीया एनव्हीएसपी या पोर्टलद्वारे सुरु केली आहे. मतदान कार्डमध्ये असलेल्या चुकांची दुरुस्ती ऑनलाईनद्वारे करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. घर बसल्या ही कामे करता येणार आहेत.
रायगड जिल्हयातील दोन हजार 660 जणांनी या पोर्टलच्या अधारे मतदान कार्डमधील दुरुस्ती, नाव बदलणे अशा अनेक प्रकारची नोंदणी करून आधुनिकेचा अधार घेतला आहे. या पोर्टलला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे या आकडेवारीनुसार स्पष्ट होऊ लागले आहे. पनवेल येथील विधानसभा मतदार संघातून 971 जणांनी तर अलिबाग मतदार संघातून 229नोंदणी केली आहे. पनवेलमधून चांगला प्रतिसाद मिळाला असून, इतर विधानसभा मतदार संघाच्या तुलनेने अलिबागमध्ये फारच कमी प्रतिसाद असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
पोर्टलद्वारे झालेल्या मतदान नोंदणीवर नजर
विधानसभा मतदान केंद्र नोंदणी झालेली संख्या
पनवेल – 971
कर्जत – 326
उरण – 366
पेण – 236
अलिबाग – 229
श्रीवर्धन – 248
महाड – 284