न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपरिषदेत बनावट पावत्या सादर करून सुमारे 33 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी खोपोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
2024 मध्ये चार विकासकांनी नगरपरिषदेत शुल्क भरल्याच्या खोट्या पावत्या सादर केल्याचे उघड झाल्यानंतर मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी फौजदारी कारवाईची मागणी केली होती. तसेच संबंधित विकासकांनीही आपण पैसे भरले असून, फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. तक्रारींची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी रजनीकांत मुसळे याच्यासह तत्कालीन लेखा विभाग व सीएफसी विभागातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नगरपालिकेच्या महसुलाला फटका बसवणाऱ्या या घोटाळ्यामागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.







