| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पोलीस भरती प्रकरणात निवड झालेल्या महिला उमेदवारांकडून खंडणी गोळा केल्या प्रकरणात रायगडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांची चौकशी करण्यात आली. त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले जाणार असल्याचे पोलीस उप अधीक्षक सोनाली कदम यांनी सांगितले.
अलिबाग येथील खंडणीच्या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या लिपिकास अटक झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. या प्रकरणात आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांची दोन तास चौकशी झाली असून त्यांचा जबाब घेण्यात आला आहे. यानंतर त्यांची ३० मे रोजी पुन्हा चौकशी होणार आहे. रायगड पोलीस दलात भरतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू होती. ही तपासणी करताना १५ महिला उमेदवारांकडून प्रत्येकी १५०० रुपयांची रक्कम जिल्हा शल्यचिकित्सकांचे लिपिक प्रदीप ढोबळ याने वसूल केले. पैसे दिले नाहीत तर वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरविण्याची धमकी देण्यात आली होती.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ढोबळ याला अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. हे प्रकरण घडल्यानंतर जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने तडकाफडकी रजेवर गेले होते. रजेवरून परत आल्यावर शनिवार २० मे रोजी ते पोलीस चौकशीला सामोरे गेले. पोलीस भरती उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीत आणखी काही उमेदवारांकडून पैसे घेण्यात आले आहेत का… ?याची चौकशीही पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.