उमटे धरणाने गाठला तळ

दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू; पाणीकपातीमुळे नागरिक चिंतेत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, धरणाने अक्षरशः तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित साठा मे महिन्यापर्यंत पुरेल का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, पाणीटंचाईचे गंभीर संकट डोके वर काढत आहे. यामुळे प्रशासनाने पाणीकपात अधिक कडक करत रविवारी (दि. 5) पासून दोन दिवसआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, गावागावांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारित असलेले उमटे धरण अलिबाग तालुक्यातील रामराज विभागासाठी जीवनवाहिनी मानले जाते. बोरघर ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा आणि चौल या ग्रामपंचायतींसह सुमारे 45 गावांतील तब्बल 60 हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.

पावसाळ्यापर्यंत पाणी टिकवण्यासाठी प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच एक दिवस आड पाणी कपात लागू केली होती. मात्र, वाढते तापमान आणि अपुरा साठा यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. सध्या धरणात अवघा 20 मीटर इतकाच जलसाठा उरल्याची माहिती समोर आली आहे. जलसाठा झपाट्याने घटत असल्याने अनेक गावांमध्ये दोन दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उमटे धरण तळाला लागल्याने मे महिन्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

गढूळ पाण्यामुळे आरोग्याला धोका
उमटे धरणातील गाळ काढण्याकडे जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. परिणामी, धरणात पाण्यापेक्षा गाळाचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वर यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढला असून, आरोग्य विभागासमोरही नवीन आव्हान उभे राहिले आहे. पाणीटंचाईसोबतच आरोग्यधोक्याचे दुहेरी संकट नागरिकांवर ओढावले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Exit mobile version