स्मशानभूमीलगत आढळल्या बेवारस बॅगा

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या कडेला असलेल्या पाटीलपाडा स्मशानभूमीलगत झाडाझुडुपांमध्ये सौंदर्य प्रसाधने असलेल्या 25 किलो वजनाच्या शेकडो बेवारस बॅगा आढळून आल्या आहेत. अज्ञातांनी चोरीच्या उद्देशाने लाखो रुपये किंमतीची सौंदर्य प्रसाधने या ठिकाणी टाकून दिली असावीत, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.

मागील दोन दिवस खोपटा येथील पाटीलपाडा या स्मशानभूमीची रोड लाईटची वायर कोणीतरी तोडत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे पाटील पाड्यातील नागरिकांनी रविवारी (दि.4) वायर दुरूस्तीसाठी विज कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी घेऊन गेले असताना त्यांना हा प्रकार दिसून आला. मात्र, नेमका हा माल या ठिकाणी कोणी टाकला, याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्या गोण्यांची पाहणी केली असता त्यावर इंग्रजीमध्ये बटाईल मेथॉक्सी डीबेंझोल मिथेन अवेबेंझोन असे नाव असून, त्यावर 2028 ची एक्सपायरी तारीख आहे. ही प्रत्येक गोणी 25 किलोची असून, त्याला कोणत्याही प्रकाराचा वास येत नाही. असे असतानाही लाखोंच्या किंमतीची सौंदर्य प्रसाधने झाडाझुडुपांमध्ये टाकण्याचे प्रयोजन काय? अज्ञातांनी चोरीचा माल या ठिकाणी टाकला असावा, अशा शंका-कुशंकाही ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Exit mobile version