| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील आमटेम पाचआंबेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 4 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी साळीदे बुर्डी येथे झालेल्या घरफोडीनंतर पुन्हा चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसंती विष्णनाथ तांबोळी या वाढदिवसानिमित्त 27 मे रोजी पनवेल येथे गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे लोखंडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. या चोरीमध्ये दोन तोळ्यांची सोन्याची चेन, एक तोळ्याचा सोन्याचा हार, सोन्याची नथ तसेच एक लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. ही घटना 27 मे रोजी रात्री 11 ते 28 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत. वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
