| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलजवळील भिंगारी-कांदेवाडी परिसरात चारचाकी वाहनातून आलेल्या तीन संशयित व्यक्तींना ग्रामस्थांनी जाब विचारत परिसरातून जाण्यास भाग पाडले. त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांनी सतर्कता दाखविल्याने संभाव्य अनुचित प्रकार टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तीन व्यक्ती एका चारचाकी वाहनातून गावात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी त्यांना थांबवून गावात येण्याचे कारण विचारले. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारत परिसरातून निघून जाण्यास सांगितले. अखेर या व्यक्तींनी तेथून काढता पाय घेतला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गावात अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद वाहन आढळल्यास सावध राहावे, तसेच लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास स्वतःहून कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित व्यक्ती नेमक्या कोणत्या कारणासाठी गावात आल्या होत्या, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.







