। अलिबाग । प्रमोद जाधव ।
दोन वर्षांपूर्वी थाटामाटात वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचे दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, अजूनपर्यंत या जागेवर प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली नाही. हे विद्यालय कधी उभे राहणार, असा प्रश्न जिल्ह्यातील असंख्य नागरिकांना निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्यालयाची प्रतीक्षा लागून राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर येथे 52 एकर जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. महाविद्यालयाबरोबरच रुग्णालय, ग्रंथालय, वसतिगृह, दोन टप्प्यात होणार्या वास्तूच्या कामाचा शुभारंभ मागील दोन वर्षांपूर्वी करण्यात आला. मोठा गाजावाजा करीत या कामाचे उद्घाटन झाले. त्यामुळे हे काम लवकरच सुरु होईल, अशी अलिबागकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना आशा होती.
सुरुवातीला ईपीआयएल कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा हा ठेका रद्द करण्यात आला. त्यानंतर रॅक इन्फ्रास्ट्रक्चरकडे ठेका सोपविण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निविदा प्रक्रियेतून या एजन्सीला काम देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून 406 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ईडीबी बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. कर्जाची प्रक्रिया सुरु आहे. हे प्रकल्प उभारण्यासाठी सध्या माती परीक्षणाचे काम चालू करण्यात आले आहे. त्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
सध्या शासकीय वैद्यकीय विद्यालय अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असून, वसतिगृह अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमधील इमारतीमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या दोन वर्षांत शंभरहून अधिक विद्यार्थी डॉक्टरची पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र, अजूनपर्यंत हक्काचे वैद्यकीय विद्यालय उभे राहिले नाही.
रुग्णालयातील कर्मचार्यांची ताणाताण अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचा कारभार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमधूनच चालत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयातील कर्मचार्यांची ताणाताण झाली आहे. या कर्मचार्यांना जागा अपुरी पडत आहे. स्वतःची जागा असूनदेखील त्यांना बसण्याची योग्य जागा नसल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकरच सुरु होणार आहे. सध्या माती परीक्षणाचे काम सुरु आहे. रॅक इन्फ्रास्ट्रक्चर या एजन्सीला काम दिले आहे.
डॉ. पूर्वा पाटील,
अधिष्ठता,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
