विद्यार्थ्यांसाठी वारली पेंटिंग कार्यशाळा

उतेखोल आश्रमशाळेत सामाजिक उपक्रम; 50 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील उतेखोल येथील वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र संचलित कै. सौ. विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रविवारी (दि.4) वारली पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन पोस्को कंपनीचे सी.एस.आर. प्रमुख कुलदीप पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले.

उतेखोल आश्रम शाळेत येणारे पाहुणे, हितचिंतक तसेच समाजातील देणगीदारांना दरवर्षी विद्यार्थ्यांकडून दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पोस्टकार्डवर आकर्षक चित्रे काढून भेटकार्ड पाठविले जातात. समाज आपल्याला मदत करतो, त्यामुळे आपणही समाजाला काहीतरी देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो. यावर्षी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने पोस्टकार्ड तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना वारली चित्रकलेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यशाळेत 25 मुले व 25 मुली अशा एकूण 50 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने विविध वारली चित्रे साकारली. यावेळी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक अनिल वाघमारे व माजी विद्यार्थी मंगेश पवार हे उपस्थित होते. अनिल वाघमारे यांनी आतापर्यंत सुमारे 8 हजार विद्यार्थ्यांना वारली पेंटिंगचे प्रशिक्षण दिले असून, कार्यशाळेदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना वारली कलेचा इतिहास, वैशिष्ट्ये, चित्र काढण्याची पद्धत तसेच त्यामागील सांस्कृतिक संदर्भ यांची माहिती दिली.

या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक उत्तम पाटील व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अरुण पाटील हे उपस्थित होते. दरम्यान, या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कुलदीप पुरंदरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांची जोपासना केली पाहिजे. कला, कौशल्ये आणि नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात केले तरच भविष्यातील स्पर्धेत आपण टिकू शकतो. तसेच, समाज आपल्याला नेहमी काही ना काही देत असतो; त्याचप्रमाणे आपणही समाजाला काहीतरी दिले पाहिजे,” असेही ते म्हणाले. ही वारली पेंटिंग कार्यशाळा घेण्याची संकल्पना वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताचे संघटनमंत्री प्रदीप पाटील यांनी सुचविली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तयार केलेली पोस्टकार्ड पाहून संस्थेचे सहसचिव रवींद्र पाटील व नितीन चांदोरकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

हजार पोस्टकार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट
कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी पुढील आठ दिवसांत तब्बल 1 हजार वारली पेंटिंग असलेली दिवाळी शुभेच्छा पोस्टकार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच समाजाशी असलेले ऋणानुबंध जपण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशील शिक्षणाचा सुंदर संगम ठरत आहे. तसेच, दिवसभराच्या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी “आज आम्ही काय शिकलो” याविषयी आपले अनुभव कथन केले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि सर्जनशीलतेला नवी ऊर्जा मिळाली.
Exit mobile version