| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत या दुर्गम आणि आदिवासी भागाने तयार झालेली तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढली आहे. शासनाचे 14 टँकर कर्जत तालुक्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी फिरत आहेत. मात्र, तरीदेखील अनेक लोकांना पाण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
तालुक्यात एका बाजूला डोंगरी भाग, त्यात आदिवासी भाग तर तालुक्याच्या मध्यभागातून वाहणारी पेज आणि उल्हास नदी या बारमाही वाहत्या नद्या सोडल्या तर अन्य सर्व भागातून वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडल्या आहेत. तालुक्याच्या भौगोलिक स्थितीमुळे सर्वत्र भूजल पातळी खालावली असून तालुक्यात पाणीटंचाई लक्षात घेऊन कृती आराखडा राबविला जात आहे. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून कर्जत तालुका पाणीटंचाई कृती आराखडा अंमलबजावणी सुरू आहे. गतवर्षी तालुक्यात रेल्वे पट्ट्यात पाणीटंचाईची झळ बसली आणि त्यानंतर उमरोली ग्रामपंचायत मधील आषाणे येथे गावात पहिला टँकर सुरू झाला. यावर्षी देखील याच ठिकाणी शासनाचा पहिला टँकर सुरू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी आणि तालुक्यात फेल ठरलेल्या जलजीवन मिशन कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई वाढ करणाऱ्या ठरत आहेत.
रायगड जिल्हाधिकारी स्तरावर मागविण्यात आलेल्या निविदेनुसार कर्जत तालुक्यासाठी 14 टँकर मंजूर करण्यात आले आहेत. या प्रत्येक टँकरची क्षमता 14 हजार लिटर इतकी आहे. या टँकरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या तालुक्यातील सात गावे आणि 22 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पेज नदीमधून पाणी उचलून लोकांना पुरवठा करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्याकडे आलेली मागणी लक्षात घेऊन त्या टंचाईग्रस्त गावे आणि वाडी यांची पाहणी केली जाते आणि टँकर सुरू केला जातो. पाणीपुरवठा विभागाचे अभियांत्रिकी सहायक गणेश जाधव हे पेज नदीवर बसून टँकर भरून पाठवण्याचे तसेच प्रसंगी टँकर वेळेवर पोहचतो की नाही हे टँकर मध्ये लावलेले जी पी एस ट्रकर यांची पाहणी करून नियंत्रित करीत आहेत.
टँकरने पाणीपुरवठा होणारी गावे
आषाणे, कोषाणे, पळसदरी, पाथरज, मोगरज, खानंद आणि धामणी
या आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी
किरवली ठाकूरवाडी, सावरवाडी ठाकूरवाडी, पळसदरी ठाकूरवाडी, वर्णे ठाकूरवाडी, चिमटे वाडी, जांभूळवाडी, झुगरेवाडी, किरवली, पेटारवाडी, लोभेवाडी, पिंगळस, फणसवाडी, भक्ताचीवाडी, सराईवाडी, पाच खडकवाडी, मोहपाडा, मेचकरवाडी, धोत्रेवाडी, बणाचीवाडी, रजपे कातकरीवाडी







