| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ ग्रामपंचायत मधील मातोश्रीनागरात गेली काही वर्षे दरवेळी पावसाळयात पाणी साठून राहते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात बांधकाम करू नये अशी स्थानिकांची ओरड असताना पुन्हा एकदा रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात पूल बांधण्यात येत आहे. दरम्यान, नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची कोणतीही परवानगी न घेता साकव पुलाची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे मातोश्री नगर आणि निर्माण नगरी तसेच गंगानगर मध्ये यावर्षी अधिक लवकर पावसाळयात पाणी तुंबून राहण्याची शक्यता आहे.
मातोश्री नगर,गंगानगर,निर्माण नगरी हा भाग सखल भागात आहे. त्यामुळे पावसाळयात सलग दोन तीन तास पाऊस झाल्यावर तेथे पाणी घरांमध्ये शिरू लागते. त्यामुळे या भागातील अतिक्रमणे दूर करून पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याचे मार्ग मोकळे ठेवावेत अशी मागणी या भागातील ग्रामस्थ करीत असतात.तरी देखील तेथून पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली आहेत.अरुंद नाल्यामुळे या भागात नेरळ कळंब रस्त्यावर पाणी येत असते आणि स्थानिकांची पावसाळ्यात धावपळ होते.दुसरीकड़े नाल्यात बांधकाम करू नये असा प्रयन्त स्थानिकांचा असताना या नाल्यात आता दुसरे एक साकव पुलाचे काम सुरु झाले आहे. त्या भागातील नाल्यात कोणत्याही प्रकारचे पुलाचे बांधकाम करू नये असे आदेश नेरळ विकास प्राधिकरणाला रायगड जिल्हा परिषदेने झालेला निर्णयावरून केले आहेत.
असे असतं गंगानगर समोर नाल्यात पूल बांधण्यात येत आहे. त्या ठिकाणी साकव पूल बांधल्यास मातोश्रीनागर मध्ये तात्काळ पावसाळ्यात पाणी शिरणार आहे. त्यामुळे आता स्थानिक ग्रामस्थांनी एकजूट करून रस्त्याच्या बाजूला नाल्यात बांधला जाणारा पूल होऊ नये यासाठी आंदोलन करण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र असे बेकायदा काम सुरू असताना नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.नेरळ विकास प्राधिकरण कडून अशी बांधकामे होत असताना कोणताही अडथळा उभा केला जात नसल्याने आश्चर्य देखील व्यक्त होत आहे.