| माथेरान | वार्ताहर |
अनेक दशकांनंतर माथेरानच्या इतिहासात नोंद व्हावी, असा ई-रिक्षा सुरू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा माथेरानमध्ये सुरू झाल्या. परंतु तीन महिन्यांच्या कालावधी पूर्ण झाल्यावर या ई-रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत.पुन्हा या ई-रिक्षा कधी सुरू होणार याला हिरवा कंदील कधी? असा सवाल येथील शालेय विद्यार्थी,दिव्यांग बांधव आणि जेष्ठ नागरिक येथे करीत आहेत.
माथेरान शहराच्या इतिहासात प्रथमच ई-रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाल्या.तीन महिने चालविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक ई-रिक्षांना माथेरान मधील शालेय विद्यार्थी,दिव्यांग बांधव जेष्ठ नागरिक आणि पर्यटकांकडून येथे उदंड प्रतिसाद मिळाला होता.पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर येथे येत होते.पर्यटकांची अलोट गर्दी पहावयास मिळत होती.तर पन्नास हजाराहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला.यावरून हि ई-रिक्षा सेवा किती फायद्याची असून सर्वांसाठी किती महत्वाची आहे हे स्पष्ट झाले. परंतु प्रायोगिक तत्त्वावर सुरू असणाऱ्या ई-रिक्षा पाच मार्च रोजी बंद करण्यात आल्या.तेंव्हापासून या 21 लाख रुपये खर्च करून आणलेल्या सात ई-रिक्षा येथे नगरपालिकेच्या आवारात धूळ खात उभ्या आहेत.हि ई-रिक्षा सेवा लवकरात लवकर सुरू करावी अन्यथा अजून काही महिने या ई-रिक्षा बंद राहिल्या तर या ई- रिक्षा भंगारात काढाव्या लागतील असे येथील शालेय विद्यार्थी,नागरिक आणि पर्यटक बोलत आहे.तर या ई-रिक्षा कधी सुरू करणार याला कधी हिरवा कंदील येथे दाखवणार असा प्रश्न देखील येथे उपस्थित केला जात आहे.
पाच मार्चपासून ई-रिक्षा बंद झाल्या आहेत. तेव्हापासून रिक्षा पालिकेच्या आवारात धूळखात उभ्या आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षांची बॅटरी तरी येथे चार्ज करतात की नाही, असा प्रश्न पडला आहे. ई-रिक्षा बंद झाल्या आणि येथील शालेय विद्यार्थ्यांची पायपीट पुन्हा सुरू झाली. या ई-रिक्षा निदान विद्यार्थ्यांसाठी तरी सुरू ठेवल्या पाहिजे होत्या.जवळपास तीन महिने होत आले असून या ई- रिक्षा बंद आहेत.या रिक्षा लवकर सुरू व्हाव्यात अशी आमची मागणी आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी हि खूप लाभदायक सेवा सुरू होती.
नूरमोहम्मद शेख, माथेरान
आम्ही डिसेंबर महिन्यात माथेरानला आलो होतो तेंव्हा ई-रिक्षा सुरू होती.आत्ता आम्ही मे महिन्यात पुन्हा येथे आलो असता हि ई-रिक्षा सेवा बंद झाली असे समजले त्यामुळे माथेरान टॅक्सी स्टँड ते माथेरान बाजार पेठ या तीन किलोमीटर अंतराचा प्रवास खूपच त्रासदायक व खर्चिक झाला.त्यामुळे ई-रिक्षा लवकर सुरू करावी.
प्रणय कोळी,पर्यटक,ठाणे