। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील गोरेगाव-मोर्बा मार्गावर वडवली गावाच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 1) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. घरातील कचरा रस्त्यापलीकडे टाकून पुन्हा घरी परतत असताना भरधाव टेम्पोने महिलेला जोरदार धडक देत काही अंतरा पर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने वडवली गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कैसर जुल्फिकार येलूकर रा. वडवली, ता. माणगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी सकाळीसाडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्या घरातील कचरा रस्त्यापलीकडे टाकून पुन्हा आपल्या घराकडे परतत होत्या. याच वेळी गोरेगाव बाजू कडून मोर्बाकडे जाणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, टेम्पोने महिलेला काही अंतरा पर्यंत फरफटत नेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कैसर जुल्फिकर येलूकर यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती गावात पसरताच वडवली गावासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिवसेना नेते शरीफ हारगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सज्जादभाई डावरे, वडवली ग्रामपंचायतीचे सरपंच मधर डावरे, गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बासी, असद फकी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी तसेच माणगाव उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, ग्रामस्थांकडून अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली. जखमी महिलेला तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. गोरेगाव – मोर्बा मार्गावर घडलेल्या या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरधाव वाहनां मुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असून, गावांच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. एका निष्पाप महिलेचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने वडवली परिसरात शोककळा पसरली आहे.




