| तळा | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य सरकारने 1 मेला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. मात्र आपला दवाखाना सुरू करताना त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी हे पदच भरले गेले नसल्यामुळे रुग्णांना औषध कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र दिनी राज्यातील 342 ठिकाणी आपला दवाखाना योजना सुरू करण्यात आली.
जिल्ह्यातही 15 ठिकाणी आपला दवाखाना व 31 आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स आणि आरोग्य सेवक अशी तीनच पदे भरलेली आहेत. याचबरोबर महत्वाचे असलेले औषध निर्माण अधिकारी हे पद शासनाने कोठेही भरलेले नाही. फार्मसी ऍक्ट 1948 कलम 42,(1) नुसार केवळ नोंदणीकृत फार्मासिस्टलाच औषध वितरणाचा परवाना असतो इतरांनी औषध वितरण केल्यास ते कायद्याचे उल्लंघन ठरते. डॉक्टर किंवा परिचारिका यांनाही काही औषधे वितरित करिता येत नाहीत. असा दावा फार्मासिस्ट संघटनेने केला असून तात्काळ औषध निर्माण अधिकारी हे पद भरावे अशी मागणी केली आहे.
1 मे रोजी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना सुरू केली असून या मध्ये केवळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स,आरोग्य सेवक ही तीनच पदे भरली आहेत. मात्र महत्वाचे असलेले औषध निर्माण अधिकारी हे पद भरलेले नाही. रुग्णांना औषध वितरणाचा अधिकार फक्त फार्मासिस्ट यांचाच असल्यामुळे राज्य सरकारने तात्काळ औषध निर्माण अधिकारी हे पद भरावे.
निलेश कार्लेकर, अध्यक्ष औषध निर्माण अधिकारी संघटना रायगड