आमदार, सरपंच, उपसरपंच यांच्या कारभाराबाबत संतप्त वातावरण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील स्थानिक आमदार यांच्या ताब्यात असणार्या थळ गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील थळ बाजार कोळीवाडा येथील ग्रामस्थांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी पुरविण्यास असमर्थ ठरणार्या आमदारांच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचांनी पाणी देण्याऐवजी ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल केल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर ग्रामपंचायतीकडून तक्रार मागे घेण्यात आल्याने पाण्यासाठी गुन्हे दाखल करण्याची नामुष्की टळली असली तरी ग्रामस्थांचा संताप कायम राहिला आहे.
सुमारे साडेतीन हजार लोकवस्ती असलेल्या अलिबाग तालुक्यातील थळ बाजार कोळीवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. हा पाणीप्रश्न ऐन पावसाळ्याच्या हंगामात सोमवारी पेटला. थळेश्वर मंदिराजवळील पाण्याची पाईप लाईन तोडल्याची तक्रार सरपंचांनी गावातील तीन ग्रामस्थांवर केली. त्यामुळे महिलांसह ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत न्यायासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली.
थळ ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. आरसीएफ कारखान्यामुळे या ग्रामपंचायतीला सुमारे पाच कोटींचे उत्पन्न मिळते. ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्यांमधील नागरिकांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. परंतु, थळ बाजार येथील कोळीवाड्यापर्यंत पाणी पोहचत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी येथील महिलांना रात्र-रात्र जागून वणवण करावी लागत आहे. घरापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत अनेक वेळा स्थानिक आमदारांसह सरपंच यांच्याकडे वारंवार कोळीवाड्यातील ग्रामस्थ, महिलांकडून मागणी करण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन फक्त दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
5 एप्रिल रोजी ग्रामपंचायत सरपंच यांच्यासमवेत ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत 12 एप्रिलपर्यंत पाणी सुरळीत सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, पाणी अद्यापपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे पाण्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या देवेश साखरकर, रुबीन साखरकर, शिरीष राजके या तीन ग्रामस्थांविरोधात सरपंच सुनील पत्रे यांनी पाण्याची पाईप लाईन तोडल्याची तक्रार 6 जून रोजी केली. ही तक्रार केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला. सरपंच पत्रे यांनी खोटी तक्रार करून अडकविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. त्यामुळे न्यायासाठी सोमवारी कोळीवाड्यातील ग्रामस्थ व महिलांनी जमाव करून अलिबाग पोलीस ठाण्यासमोर धाव घेतली. अचानक झालेल्या या गर्दीमुळे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांनी ही गर्दी कमी करण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही गटांबरोबर संयुक्तिक बैठक पार पडली. बैठकीनंतर तक्रार मागे घेण्याची तयारी ग्रामपंचायतीने दाखवून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे मान्य केले.