स्वीडनवर 2-1 अशी मात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राखीव खेळाडू आर्तेम डोव्हबिक याने अतिरिक्त वेळेत अखेरची काही सेकंद शिल्लक असताना केलेल्या गोलमुळे युक्रेनने स्वीडनवर 2-1 अशी मात करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. फुटबॉलच्या इतिहासात युक्रेनने पहिल्यांदाच युरो चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
साखळी फेरीत जेमतेम एक सामना जिंकता आलेल्या युक्रेनने बाद फेरीत मात्र आपली ताकद दाखवून दिली. ओलेक्झांडर झिनचेंको याने 27व्या मिनिटालाच युक्रेनला आघाडीवर आणले होते. मात्र त्यांना हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. पहिल्या सत्राच्या अखेरीस इमिल फोर्सबर्गने गोल करत स्वीडनला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेचा खेळ संपण्यास काही सेकंद बाकी असताना डोव्हबिक याने हेडरवर शानदार गोल करत युक्रेनला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
डोव्हबिकचा हा युक्रेनसाठीचा पहिला गोल ठरला. डोव्हबिकने गोल साकारल्यानंतर प्रशिक्षक आंद्रिय शेव्हचेंको यांनी खेळाडूंसह आनंदोत्सव साजरा केला. आता शनिवारी इंग्लंडविरुद्ध होणार्या उपांत्यपूर्व लढतीसाठी युक्रेन संघ रोमला रवाना होणार आहे.