महाड । प्रतिनिधी ।
महाड मधील शहरातील इमारती त्याचबरोबर घरांची तपासणी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आली. या तपासणीमध्ये पालिकेने सुमारे तीनशे पेक्षा अधिक इमारतीची तपासणी केली असुन यातील 34 इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली.
शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षात अनेक इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामे केली जात असताना बहूतांशी बांधकामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची असल्याने तारिख गार्डन सारख्या दुर्घटना महाड शहरामध्ये घडत आहेत. अशा दुर्घटना भविष्यांमध्ये घडू नयेत या करीता पालिकेने इमारतींचे सर्वेक्षण करुन धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत. आतापर्यंत सुमारे तीनशे पेक्षा अधिक इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. यातील 34 इमारती अत्यंत धोकादायक असल्याचे तपासणीमध्ये आढळून आल्यानंतर या इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शहरांतील हापूस तळे जवळ असलेल्या अल कासिम ही इमारत पुर्णपणे धोकादायक असल्याने या इमारती मधील सर्व रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले असुन याच परिसरामध्ये काही धोकादायक इमारती असुन त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.
शहरातील 300 पेक्षा अधिक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात आले आहे. या अहवालावरुन ज्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अशा इमारती मधील रहिवाशांना इमारतीची दुरुस्ती तातडीने करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
सुहास कांबळे, अभियंता, महाड नगरपालिका