I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
अवैध दारू विक्री करणाऱ्या पाली सुधागडचे माजी सरपंच, रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा याने कारवाईसाठी आलेल्या पाली पोलीस हवालदार तायडे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क, गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांवर बियरच्या बाटल्या फेकत शिवीगाळ केली. याप्रकरणी राजेश मपारा आणि त्याच्या पत्नीविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेत्याचा हा प्रताप जिल्हाभर पसरला असून हे प्रकरण दाबण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव येत असल्याची माहिती समोर आली आहे.
सुधागड तालुक्यातील मौजे झाप येथील बियर शॉप तसेच परमीट बियर बार येथे अवैध दारू विक्रीबाबतच्या तक्रार अर्जाची शहानिशा करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क, गुन्हा अन्वेषण शाखा व पाली पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई केली. यावेळी बियर बार मालक असलेल्या भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा याच्यावर शासकीय कामात हस्तक्षेप आणल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला.
या संयुक्त कारवाईत देशी दारू सापडल्याने विभागीय गुन्हा नोंद झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांकडून तयार केलेला अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर केला जाईल व विषयाचं गांभीर्य पाहून पुढील कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे कळते. शिवाय पाली पोलिस स्टेशनमध्ये, भारतीय दंड विधान कलम ३५३ व कलम ५०४ अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलिस हवालदार प्रशांत भगवान दबडे हे फिर्यादी आहेत.
सविस्तर माहीती अशी की पोलिस पथक, पंचांसह शासकीय काम करीत असताना आरोपी फिर्यादीच्या अंगावर धावून गेला व शिवीगाळ केली. तसेच दुय्यम निरीक्षक रमेश मारुतीराव चाटे, जवान – गणेश किसन घुगे हे कारवाई करीत असताना, सदर कारवाईत सापडलेल्या देशी दारूच्या बाटल्या टेबलावर मांडलेल्या असताना देशी दारूचा बाटल्या आरोपीने फिर्यादी, पोलिस व पंचाच्या अंगावर ढकलून दिल्या असल्याच्या तक्रारीनुसार यासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असल्याचे पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सांगितले.