कर्जत चारफाट्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आश्वासन
। नेरळ । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हॉटेल, गॅरेज आदी दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. असे असूनही या रस्त्याशी निगडित एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कर्जत नगर परिषद याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने अखेर कर्जत नारीशक्ती संघटनेच्या ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे यांनी कर्जत टिळक चौकात मंगळवारी (दि.29) सकाळपासून उपोषण सुरु केले होते. अखेर तिसर्या दिवशी प्रशासनाकडून कर्जत चारफाट्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करणयात आले आहे.
महिला असल्याने या किती काळ उपोषण करतील, त्यांना माघार घ्यावीच लागेल, असे संबंधित प्रशासनाला वाटले. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रशासनाने या उपोषणाला गांभीर्याने घेतले नाही. मात्र दुसरीकडे या नारी शक्ती संघटनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, राजे प्रतिष्टान, संभाजी ब्रिगेड, आरटीआय अध्यक्ष अमोघ कुलकर्णी आदी राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेत जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.
उपोषणाचा दुसरा दिवस आणि त्यात संघटनेला जनतेतून मिळणारा वाढता पाठिंबा पाहून प्रशासनाची धावपळ सुरु झाली. तहसीलदार विक्रम देशमुख, एमएसआरडीसीचे कनिष्ठ अभियंता रमेश माने यांनी महिला उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली. मात्र जो पर्यंत अतिक्रमण हटविण्याबाबतचे एमएसआरडीसीचे लेखी पत्र देत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नारीशक्ती संघटनेने घेतली.
उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला. उपोषणकर्त्यांच्या तब्येत खालावत होत्या. निगरगठ्ठ प्रशासकीय अधिकार्यांच्या बेजबाबदार कृतीमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. सकाळच्या सत्रात एमएसआरडीसीचे कनिष्ठ अभियंता माने पुन्हा संबंधित ठेकेदाराला घेऊन उपोषणस्थळी पोहोचून तोंडी आश्वासन देत उपोषकर्त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनवणी करू लागले. यावेळी उपस्थित काँग्रेस तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख यांनी अधिकार्यांना फैलावर घेतले. अखेर खाली मान घालत अधिकार्यांनी कसाबसा काढता पाय घेतला.
पत्र दिल्याशिवाय महिला उपोषणकर्त्या मागे हटणार नाहीत, हे वरिष्ठ अधिकार्यांना कळविताच वरिष्ठ अधिकर्यांनी नरमाईची भूमिका घेत एमएसआरडीच्या उपअभियंता सीमा पाटील यांनी कर्जतला येऊन संबंधित विभागाचे अभियंत्यांबरोबर चर्चा करत उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी तहसीलदार विक्रम देशमुख यांना बरोबर घेऊन उपोषणस्थळी सायंकाळी साडे सातला पोहोचल्या. नारी शक्ती संघटनेच्या उपोषणकर्त्यांना अतिक्रमण हटवू, असे तोंडी आश्वासन देऊ लागल्या. यावेळी उपोषणकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेत लेखी पत्र मिळाल्याशिवाय उपोषण थांबविणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे हतबल झालेल्या एमएसआरडीच्या उपअभियंता सीमा पाटील यांनी अखेर महिला नारीशक्ती संघटनेला चारफाट्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले.