| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएल स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली होती. आता उर्वरित स्पर्धा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसंबधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवी नियमावली जाहीर केली आहे.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंची सुरक्षा आणि कोरोना नियमांना समोर ठेवून ही नियमावली तयार केली आहे. यातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे, फलंदाजाने चेंडू षटकार, चौकार मारुन स्टँडमध्ये किंवा मैदानाबाहेर पाठवला, तर तो चेंडू बदलला जाईल. तसेच बाहेर गेलेल्या चेंडूला संपूर्णपणे सॅनिटाईज करुन ठेवले जाईल.बीसीसीआयच्या नियमावलीनंतर दिलेल्या माहितीनुसार, जर चेंडू स्टँडमध्ये किंवा स्टेडियम बाहेर गेला, तर चौथा पंच त्याच्याकडील चेंडूंशी तो चेंडू बदलून नवा चेंडू खेळण्यासाठी देईल. तसेच बाहेरुन आलेला चेंडू सॅनिटायज करुन त्याच्याकडील चेंडूमध्ये ठेवला जाईल.
स्पर्धेबाबत संपूर्ण सतर्कता
चेंडूंवर रिसर्च केल्यानंतर त्यातून कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता खूप कमी आहे. तरीदेखील कोणतीही जोखीम बीसीसीआय घेणार नसल्याने हा सॅनिटायजेशनचा पर्याय बीसीसीआय वापरत आहे. मागील वर्षी काही खेळाडू कोरोनाबाधित झाल्याने स्पर्धा मध्येच थांबवली होती. त्यामुळे यंदा अशी कोणतीच जोखीम बीसीसीआयला घ्यायची नाही. स्पर्धेसाठी प्रेक्षकांना बोलवण्याबाबत बीसीसीआय विचार करत असून, प्रेक्षक आले तरी त्यांना कडक नियम पाळावे लागणार आहेत.
सहा दिवसांचे कडक विलगीकरण
आयपीएलसाठी यूएईत येणार्या खेळांडूसह सपोर्ट स्टाफ अशा सर्वांना सहा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. तसेच बायो बबलमध्ये येण्यापूर्वी त्यांच्या तीन कोरोना चाचण्या होणे आणि त्या तीनही निगेटिव्ह येणे अनिवार्य आहे. इंग्लंडमधील भारतीय खेळाडूंना विलगीकरणाचे नियम पाळावे लागणार नसले तरी त्यांना बायो बबलचे नियम मात्र पाळावे लागणार आहेत.