पाली तालुक्यातील सुखकारक चित्र
सुधागड-पाली | वार्ताहर |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी गाव ठिकाणी नेटवर्क आणि अँड्रॉइड मोबाईलची वानवा आहे. अशा वेळी बच्चे कंपनी शेतीत रमतांना दिसत आहे. यातून त्यांना अभ्यासाबरोबर एक वेगळा अनुभव देखील मिळत आहे.
शाळा बंद असल्याने या असंख्य मुलांना प्रत्यक्ष आपल्या शेतात काम करून शेतीच्या कामांचा अनुभव घेता येत आहे. शिवाय यातून त्यांचे शेतीविषयक ज्ञान देखील वाढत आहे. शिक्षक कुणाल पवार यांनी सांगितले की, अभ्यासक्रमातील एक उपक्रम म्हणून क्षेत्रभेट या उपक्रमाअंतर्गत शेतीभेट देऊन विद्यार्थ्यांना नांगरणी भात लावणी असे विविध अनुभव देत होतो. पण या एका दिवसाच्या क्षेत्रभेटीत मुलांना पुरेशी माहिती मिळत नव्हती. मात्र आता शाळा नसल्याने मुले आपल्या किंवा इतरांच्या शेतात जाऊन शेतीच्या कामांचा प्रत्यक्ष कृतीद्वारे अनुभव घेत आहेत. यामुळे त्यांचे ज्ञान अधिक सखोल होत आहे. शिवाय शरीराला व्यायाम मिळून मज्जा आणि गंम्मत देखील होत आहे. तर तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी निलेश शिर्के यांनी सांगितले की माझी दोन मुले अभ्यासाला पुरेसा वेळ देऊन शेतीच्या सर्व कामांत मदत करतात. कोरोना संकटात आलेल्या या संधीमुळे मला मुलांना शेतीचे अधिक कृतीयुक्त ज्ञान व माहिती देता येते. शिवाय शेतकर्यांचे कष्ट व मेहनत आदी मूल्य देखील जोपासली जात आहेत. शिवाय त्यांना आंनद देखील मिळतो.
शाळेत जात असल्याने शेतीत काम करण्याची मज्जा आणि अनुभव कधी मिळत नव्हता. मात्र आता शाळा बंद असल्याने इतर मुलांसोबत आई वडिलांना शेतीच्या कामात मदत करतो. खूप धम्माल येते. यातून शेतीबद्दल खूप माहिती मिळाली आहे. ज्याचा उपयोग अभ्यासात देखील होतो.
स्वरदा शिर्के, विद्यार्थिनी, इयत्ता चौथी
शाळा बंद असल्याने अनेक मुले शेतीच्या कामात हातभार लावतात. काही मुले इतरांच्या शेतावर देखील मदतीसाठी जातात. यामुळे शेतीची कामे हलकी व जलद होत आहेत. या बरोबर मुलांनी अभ्यासाला देखील तेवढाच वेळ देणे आवश्यक आहे.
सरिता सावंत, मुख्याध्यापिका, वावळोली आश्रमशाळा.