। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी हे आदेश जारी केले आहेत.
उरण तालुक्यासह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची खूप मोठी समस्या आहे. नवी मुंबई ते ठाणे तसेच मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड रहदारी, वाहतूक कोंडी असते. यात जेएनपीटीमधून निघणार्या अवजड कंटेनर वाहतुकीमुळे सामान्य वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दिवसा या अवजड वाहनांना वाहतूक बंदी करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. मात्र, त्याकडे तितके गांभीर्याने पहिले जात नव्हते. आता ठाण्याच्या वाहतूककोंडीची दाखल घेतल्याने जेएनपीटीमधून निघणार्या मार्गावरील वाहतूककोंडीला चाप बसणार आहे. कारण, दिवसा या जड वाहनांना रस्त्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमुळे दैनंदिन प्रवास करणार्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.