चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झिराड ग्रामपंचायतीने अद्ययावत असे विलगीकरण कक्ष व स्व. शैलेश ( बाळू ) सदानंद चापडे यांच्या नावाचे रुग्ण सेवा केंद्र सुरु केले आहे. या केंद्राचा नामकरण व लोकार्पण सोहळा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेख पाटील यांच्या हस्ते बुधवारी पार पडला.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉ दिप्ती देशमुख, पंचायत समिती सदस्या समिहा पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. कैलास चौलकर, झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच संध्या गावडे, डॉ. राजेंद्र मोकल, ग्रामसेवक संजय पाटील, रवि म्हात्रे, महेश माने, राहूल भोईर, हरेश भोईर, अशोक म्हात्रे, दिवंगत शैलेश चापडे यांच्या मातोश्री सरिता चापडे व चापडे कुटूंबिय तसेच झिराड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सर्वांचे सहकार्य लाभले तर कोव्हीडच्या या दृष्ट चक्रातून बाहेर पडण्यास मदत होईल. कोरोनावर मात करण्यासाठी विलगीकरण केंद्र आवश्यक आहे. आपल्या कुटूंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षितेसाठी कोरोनाचा संसर्ग झालेल्या परंतु कमी लक्षणे असलेल्या रुग्णांनी स्वतःचे विलगीकरण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेकापक्ष आणि पाटील कुटूंबाची समाजासोबतची बांधीलकी कायम असल्यानेच या परिस्थितीतही काम करीत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. यावेळी त्यांनी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या कार्याचे कौतुक केले.
दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. कोरोना रुग्णांना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी ने -आण करताना मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे. रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या प्रयत्नाने झिराड ग्रामपंचायतीमार्फत झिराड या ठिकाणी कोरोना रुग्णांसह अन्य आजारावरील रुग्णांसाठी रुग्ण सेवा केंद्र सुरु केले आहे. झिराडचे सदस्य दिवंगत शैलेश चापडे यांचे नाव या रुग्ण सेवा केंद्राला देण्यात आले आहे. तसेच कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी वातानुकूलित विलगीकरण कक्ष उभारण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार होऊन रुग्ण बरे होण्यास या विलगीकरण कक्षामुळे उपयोगी ठरणार आहे. या विलगीकरण कक्षामध्ये ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात येणार असून अन्य वैद्यकिय सेवादेखील पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 20 वर्षांपासू गरजू विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या वाटप करण्यात आले.