| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश करोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशांनी कोरोना लसीकरणावर जोर दिला आहे. त्यात अनेक देशांनी करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसताच नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. करोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे.कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून घरातच असणार्या लोकांना मानसिक थकवा जाणवत आहे. त्यामुळे ते सक्तीने बाहेर पडत समाजामध्ये मिसळत आहेत. मात्र संपर्क वाढल्याने करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यात अनेक देशांनी कोरोनावरील निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं बंधनकारण नसल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक देशात लसींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने मृत्यूदर वाढला आहे.कोव्हॅक्सिन कोरोनावर प्रभावशाली असल्याचं देखील सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. या लसीचा प्रभाव चांगला दिसत आहे. कोव्हॅक्सिनच्या 3 टप्प्यातील अहवालाचा अभ्यास सुरु आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सिनला जागतिक परवानगी मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.