नेरळ | वार्ताहर |
पावसाने दडी मारलेली असतानादेखील रायगड जिल्हा अनलॉक झाल्यासारखे पर्यटक कर्जत तालुक्यात थव्यांनी एकत्र आले आहेत. या पर्यटकांनी कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळे फुल्ल झाली असून, त्यांच्या गर्दीमुळे कर्जत तालुक्यात कोरोना पुन्हा डोके वर करण्याची भीती वाढली आहे. दरम्यान, शेकडो ने आलेल्या पर्यटकांमुळे कर्जत तालुक्यातील रस्त्यावर वाहतूक कोंडी आज दिवसभर दिसून आली.
रायगड जिल्हा प्रशासनाने कर्जत तालुक्यातील पाणवठे आणि गडकिल्ले तसेच धरणावर जाण्यास बंदी घातली आहे. असे असताना आज कर्जत तालुक्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक आले होते. माथेरानमध्ये पर्यटनास शासनाने परवानगी दिली आहे. कर्जत तालुक्यातील सर्व व्यवहार शनिवार आणि रविवारी बंद आहेत. मात्र फार्म हाऊस, रिसॉर्टवर गर्दी आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे आणि त्यांनी आणलेल्या वाहनांमुळे कर्जत सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी आज दिवसभर आहे. धरणे आणि धबधब्यांवर बंदी असल्याने मागील शनिवार-रविवारप्रमाणे या आठवड्याच्या विकेंडलादेखील पेब किल्ला, पेठ किल्ला तसेच माथेरानला पर्यटकांची पावले वळली होती. माथेरान वगळता तालुक्यात आजही शुक्रवार सायंकाळपासून शनिवार-रविवार पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. रोजगार हिरावला गेल्याने लहान व्यावसायिकोवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो, याची भीतीदेखील ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.
आज सकाळपासून नेरळ-माथेरान घाटरस्त्यात वाहतूक कोंडी होती. माथेरानला जाण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आपल्या बच्चे कंपनीला घेऊन आणि बॅगा सांभाळत किमान दोन किलोमीटर अंतर चालत जात होते. त्यात माथेरान मधील दस्तुरी नाका येथील वाहनतळ फुल्ल झाले होते. त्यामुळे खासगी वाहने घेऊन येणार्या पर्यटकांना वाहतूक कोंडी मुळे वाहने घेऊन जाता येत नव्हते. तालुक्यातील माथेरान घाटात असलेल्या पेब किल्ला येथे शेकडोने पर्यटक आले असल्याने पर्यटकांना तेथे लोखंडी शिडीवरून किल्ला चढताना ट्रेकर्स यांना थांबून राहात वाट काढावी लागत होती. तर, पेठ गावाच्या मागे असलेल्या कोथळीगडावर सकाळ पासून ट्रेकर्स चा राबता होता.आंबिवली गावाच्या हद्दीत वाहने पार्किंग करून शेकडो ट्रेकर्स कोथलीगड चढत होते. या सर्व गर्दीमुळे कर्जत तालुक्यात गर्दी वाढली असून, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
किल्ल्यांकडे पर्यटकांची पावले
धरणे आणि धबधब्यांवर बंदी असल्याने मागील शनिवार-रविवारप्रमाणे या आठवड्याच्या विकेंडलादेखील पेब किल्ला, पेठ किल्ला तसेच माथेरानला पर्यटकांची पावले वळली होती. माथेरान वगळता तालुक्यात आजही शुक्रवार सायंकाळपासून शनिवार-रविवार पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे.