। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय पुरातत्व खात्याने संरक्षित केलेली ताजमहालसह देशातील 3,693 ऐतिहासिक स्थळे आणि देशभरातील 50 वस्तुसंग्रहालये पर्यटकांसाठी 16 जूनपासून खुली होणार आहेत. मात्र पर्यटकांना यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील ऐतिहासिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली आहे. कोरोना नियमावली पाळून पर्यटकांना 16 जूनपासून ऐतिहासिक स्थळांना भेटी देता येतील, असे ट्विट केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या आदेशानुसार राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार राज्यातील ऐतिहासिक स्थळे खुली केली जाणार आहेत.
ताजमहाल , आग्रा फोर्ट , फतेहपूर सिक्री आणि इतर केंद्रीय संरक्षित स्थळे,म्युझियम्स खुली होणार आहेत . मात्र ताजमहालच्या अंतर्गत भागासह पर्यटकांना ऐतिहासिक स्थळावर कुठेही स्पर्श करता येणार नाही . पर्यटकांना मास्क वापरणे , सोशल डिस्टन्सिंग नियम पाळणे बंधनकारक असल्याचे आग्रा पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे.