मुंबई | प्रतिनिधी |
शेजारणीकडे खेळायला गेल्याचा राग आल्याने आईने मुलीला मेणबत्तीने चटके दिल्याची आणि बेदम मारहाण केल्याची घटना बंगळुरूत घडली आहे. इथल्या हेब्बाळ भागात या मायलेकी राहातात. आईने मुलीला जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ही मारहाण केली होती, मात्र हा प्रकार 5 जुलै रोजी उघडकीस आला आहे. सोमवारी ही मुलगी खेळताना पडली होती आणि जखमी झाली होती. तिची आई तिला दवाखान्यात गेऊन गेली असता डॉक्टरांना मुलीच्या हातावर भाजल्याच्या जखमा दिसल्या होत्या.
मुलीच्या हातावर भाजल्याच्या जखमा दिसल्यानंतर डॉक्टरही चपापले होते. त्यांनी ही बाब तातडीने पोलिसांच्या कानावर घातली. एक महिला पोलीस अधिकारी या प्रकरणासाठी नेमण्यात आली. या अधिकाऱ्याने मुलीला गाठले आणि तिची चौकशी केली. यावेळी या मुलीने सांगितले की ती शेजारणीकडे खेळायला गेली होती. तिची आई जेव्हा कामावरून घरी आली तेव्हा आपली मुलगी शेजारणीकडे खेळत असल्याचं पाहून तिचा राग अनावर झाला. आईने मला घरी आणलं आणि काठीने मारायला सुरुवात केली. नंतर तिने माझ्या उजव्या हातावर मेणबत्तीने चटके दिले असं या मुलीने म्हटलंय.
या मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी आणि बाल न्याय कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली असता त्यांना कळालं की या मुलीची आणि आणि वडील हे वेगळे झाले आहेत. या दाम्पत्याला 2 मुली होत्या, ज्यातील मोठी मुलगी ही वडिलांसोबत राहाते तर लहान मुलगी ही आईसोबत राहाते. या मुलीच्या आईने पोलिसांना सांगितलंय की तिची शेजारीण तिच्याबद्दल सतत वाईटसाईट बोलत असते, ज्यामुळे तिची मुलगी त्यांच्याकडे खेळायला गेलेली तिला आवडत नाही. याच कारणामुळे आपली मुलगी त्यांच्याकडे खेळायला गेली असल्याचं दिसल्यानंतर मला संताप अनावर झाला असं या महिलेने सांगितलं आहे.