। पुणे । वार्ताहर |
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात सातत्याने होणार्या वाढीसह आता कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि घरगुती वापराच्या पाइप नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरातही वाढ झाली आहे. सीएनजी किलोमागे 90 पैशांनी आणि पीएनजी एक रुपया 90 पैशांनी महागला आहे. नवीन दर रविवारपासून (एक ऑगस्ट) लागू झाला आहे. त्यामुळे एक किलो आणि पीएनजीसाठी अनुक्रमे सीएनजीसाठी 57 रुपये 50 पैसे आणि 29 रुपये 10 पैसे मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरातही 73 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावरील भार आणखी वाढणार आहे.
करोना आणि लॉकडाउन यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्या मध्यमवर्गीयांना चालू वर्षाच्या सुरुवातीपासून इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला नव्वदीच्या घरात अससेला पेट्रोलचा दर आता 107 रुपये 90 पैशांवर गेला आहे. सत्तरच्या घरात असलेले डिझेल आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. तर, घरगुती गॅसची (एलपीजी) किंमत 644 रुपयांवरून साडेआठशे रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडला आहे. या सगळ्या परिस्थितीत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली नव्हती. मात्र, आता सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे.