। मुंबई । प्रतिनिधी ।
विनोबांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभलेल्या, माधुरी रावकर यांचे अल्पशा आजारानंतर गुरुवारी (दि. 24) मुंबई येथे निधन झाले. निधनासमयी त्या 84 वर्षाच्या होत्या. त्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. अनेक मुलांवर त्यांनी आपले उच्च विचारांचे संस्कार केले. त्यांचे पती ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक मधू रावकर यांच्या सामाजिक कार्यातही त्या सहभागी होत्या. विशेष म्हणजे विनोबाजींच्या कार्यात मधू रावकर यांना मोकळेपणाने कार्य करत यावे, यासाठी त्यांनी कुटुंबाची पूर्ण जबाबदारी पेलून धरली होती.
विनोबांच्या जन्मस्थानाशी त्यांचा दीर्घकाळ निकटचा संबंध होता. विनोबांचे निकटवर्ती व ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते दिवंगत मधु रावकर यांच्या त्या सुविद्य पत्नी होत्या. विनोबांना भेटून व त्यांचा आशीर्वाद घेऊन मधू-माधुरी यांनी विवाह केला होता.
मधु रावकर यांचा विनोबांच्या भूदान यात्रेतील सहभाग, गोवा मुक्तिलढा व संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, तसेच विनोबांच्या विचारांना वाहिलेले ’युगारंभ’ या साप्ताहिक/ दैनिक या सर्व कार्यात माधुरीताईंचा सक्रिय सहभाग होता. मधू रावकर यांच्या ’युगारंभ’ साप्ताहिकातील लेखावर सनातनी हिंदुत्ववाद्यांनी गोवा व सावंतवाडी येथे दोन केस कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. मधु रावकर गेल्यानंतरही त्या केस माधुरीताई लढवत राहिल्या व जिंकल्याही!
माधुरीताईंच्या पश्चात सरस्वती, प्रज्ञा, प्रसन्ना व प्रसाद अशी मुले व नातवंडे आहेत. सर्व मुले व जावई पत्रकार आहेत. सरस्वती या विनोबा जन्मस्थानाच्या उपक्रमात सक्रिय असून मुंबई आकाशवाणीवर उच्च पदावर कार्यरत आहेत. तर प्रसाद हे दैनिक लोकसत्ताचे उपसंपादक असून प्रज्ञा व प्रसन्ना पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशाप्रकारे संपूर्ण रावकर कुटुंब आजही विनोबांच्या कार्यात कार्यरत आहेत.
मधु रावकर यांच्या अस्थी विनोबांच्या जन्मस्थानी जेथे जमिनीत विसर्जित करण्यात आल्या, तेथेच आता माधुरीताई यांच्याही अस्थी विसर्जित करण्यात येणार आहेत.