। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामीण भागांतील नागरिकांना हक्काचा निवारा देणार्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात ममहाआवास अभियान-ग्रामीणफ राबविले जात आहे. मंगळवारी (दि. 15 रोजी) महाआवास अभियान-ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राज्यस्तरावर पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते जिल्ह्यातील कुरुळ येथील अनिल परशुराम पाटील व रामराज येथील रत्नाकर महादेव पालकर यांना ई-गृहप्रवेश चावी देण्यात आली. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ऑनलाइन कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.
महा आवास अभियान- ग्रामीण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरकुल निर्मिती करण्यात येत आहे. या अभियानातंर्गत लाभार्थ्यांना घरकुलासाठी 1 लाख 20 हजार, मनरेगातंर्गत 18 हजार व वैयक्तिक शौचालयासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत 12 हजार असे 1 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
रायगड जिल्ह्यात महाआवास अभियान-ग्रामीणची प्रभावी अंमबजावणी सुरू आहे. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 7 हजार 752 घरकुले मंजूर करण्यात आली होती. यामधील 6 हजार 700 घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. तर राज्य योजनेतंर्गत 3 हजार 815 घरकुले मंजूर असून, 3 हजार 305 घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अपूर्ण घरकुलांची कामे 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये 30 जूनपर्यंत बाहेरील व त्यांनतर 15 जुलैपर्यंत आतील काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्यांना आदर्श घरकुलांबाबतची माहिती करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे डेमो हाऊसेसची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. घरकुल बांधणीबरोबरच लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. यामध्ये घरकुलासोबत शौचालयाचा लाभ, नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा लाभ, गॅस जोडणीचा लाभ, वीज जोडणीचा लाभ, लाभार्थ्यांना उपजिवीकेचे साधन मिळवून देण्यासाठी काम करणे याचा समावेश आहे.
महा आवास योजना दृष्टीक्षेप-
प्रधानमंत्री आवास योजना मंजूर घरकुले : 7 हजार 752
बांधकाम पूर्ण झालेली घरकुले : 6 हजार 700
विविध राज्य योजनेंतर्गत मंजूर घरकुले : 3 हजार 815
बांधकाम पूर्ण झालेली घरकुले : 3 हजार 305