चंदीगड | वृत्तसंस्था |
भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचं चंदिगडमधील रुग्णालयात निधन झालं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.
कोरोनाची लागण झाल्यानंतर 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना चंदिगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्याठिकाणी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यी प्रकृती अधिक ढासळली. त्यानंतर डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यामध्ये यश आलं नाही.
चंदिगडमध्ये रुग्णालयाचे प्रवक्ते अशोक कुमार यांनी, मिल्खा सिंग यांचं निधन रात्री 11.30 वाजता झालं असल्याचं सांगितलं आहे.
मिल्खा सिंग यांना 20 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 3 जून रोजी त्यांना पीजीआयएमईआरच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. 13 जून पर्यंत ते याठिकाणी दाखल होते.
त्यादरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली होती. 13 जून रोजी कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या इतर काही समस्यांमुळं त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांच्या पथकानं अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना वाचवता आलं नाही.
पाच दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचंही कोरोनामुळं निधन झालंय.