पाटील बंधूंचा नवा प्रयोग यशस्वी
खर्चात मोठ्या प्रमाणात बचत
पोयनाड | वार्ताहर |
पोयनाड विभागात चोंरगोंडी येथील विनोद एकनाथ पाटील व अवधुत एकनाथ पाटील या शेतकरी बंधुनी भातशेतीमध्ये भातलावणीऐवजी यावर्षी प्रथमच भात टोकण पद्धतीचा प्रयोग केला असून तो कमालीचा यशस्वी झाला आहे. कोकणा मध्ये दरवर्षी भातपिकाचे क्षेत्र कमी होत आहे. याचे कारण आहे. उत्पन्न व खर्च याचा मेळ बसत नाही. कुटुंबाला लागेल तेवडे भात पिकवले तरी नुकसानच तांदुळ विकत घेतले तर परवडतात. परंतु, आजही बरेच शेतकरी आपल्यापुरती भातशेती करतात. कारण, घरचे धान्य मिळते.
इथला शेतकरी भातपिकातील खर्च कमी कसा येईल यासाठी प्रयत्नशिल असतो. भातलावणीसाठी लागणार्या मजुरांची मजुरी दरवर्षी वाढत आहे. भातलावणीच्या खर्चात बचत होण्यासाठी चोरगोंडी येथील विनोद पाटील व अवधत पाटील शेतकरी बंधुनी आपल्या एक एकर भात खाचरात टोकण पध्दतीचा प्रयोग केला आहे. हा प्रयोगयशस्वी झाला असुन. पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतावर भेट देत आहेत.
विनोद व अवधुत यांनी जूनमधील पहिल्या पावसानंतर भातखाचराची टिलर वापरून उभी अडवी नांगरणी केली. मजुरांद्वारे लावणीप्रमाणे भाताचे दाणे भातखाचरात टोकण केले. सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे लावणीची कामे मंद गतीने सुरू आहेत. अशा वेळी पाटील बंधुची टोकण पध्दत भाव खाऊन गेली आहे.
खर्चात बचत
लावणीपेक्षा निम्या मजुरांकडून भात टोकण्याचे काम पुर्ण झाले. भाताची उगवण झाल्यानंतर खताचा एक हप्ता दिला. आता आठ ते दहा इंचपर्यंत भातपिक वाढले आहे. भातपिक चांगल्या अवस्थेत आहे. टोकण भात पध्दतीने खर्चात बचत होते, असा दावा पाटील बंधुनी केला आहे.