शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
केंद्र सरकारने शेतकर्यांवर लादलेली अन्यायकारी कृषी विधेयके रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला 26 जून रोजी सात महिने पूर्ण होत आहे. तसेच देशात दि. 25 जून 1975 रोजी लागू केलेल्या आणीबाणीलाही 46 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला असून, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले आहे.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरु असणार्या शेतकरी आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला असून, त्याचदिवशी शेती बचाव, लोकशाही बचाव दिन पाळण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून देशभर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने राजभवनांसमोर निर्दशने करण्यात येणार आहेत. तरी सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांवर निषेध, निदर्शने, धरणे आदी शक्य असेल ते आंदोलन करुन निवेदन द्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.