। दापोली । वृत्तसंस्था ।
दिल्लीतील बलात्कार पीडित अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांचे फोटो ट्विटरवर शेअर केल्यामुळं काँग्रेसचे नेते राहुल गांधी अडचणीत आले आहेत. ट्विटरनं त्यांचे खातं तात्पुरते बंद केल्याची कारवाईनंतर आता त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपचे दापोली तालुका अध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी अॅड. पंकज सिंग आणि अॅड. गौतम यांच्या मार्फत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पीडित मुली किंवा महिलेची ओळख गुप्त राखणे आवश्यक असतं. असे असतानाही राहुल गांधी यांनी दिल्लीतील पीडित मुलीच्या आई-वडिलांचे फोटो ट्विटरवर शेअर करून त्यांना अडचणीत आणलं आहे, असा आरोप म्हादलेकर यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात पॉक्सो आणि जुवेनाइल जस्टिस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. म्हादलेकर यांच्या याचिकेनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं राष्ट्रीय बाल हक्क आयोग, दिल्ली पोलीस आणि राहुल गांधी यांना नोटीस जारी करून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
पीडितेच्या पालकांचे फोटो ट्विट केल्यानंतर दलित पॉझिटिव्ह मूव्हमेंटचे रवी पी. यांनी ट्विटरला नोटीस बजावली होती. त्यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं बंद केलं होतं. काही वेळानंतर ते सुरू करण्यात आलं. आता मकरंद म्हादलेकर यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळं राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार आहेत.