पोयनाड पोलिसांकडून वाहनचालकांची झाडाझडती
पेझारी चेकपोस्ट ते शहाबाज वाहनांच्या लांबच लांब रांगा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढत असतानाही विकेंडसाठी मौजमजा करण्यासाठी येऊ पाहणार्या पर्यटकांवर रायगड पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. पोयनाड पोलिसांनी शुक्रवारी येत असलेल्या प्रत्येक गाडीची कसून पाहणी करत फिरण्यासाठी येणार्या पर्यटकांना आल्या पावली मागे परतवून लावले. यामुळे शहाबाज ते पेझारी चेकपोस्ट दरम्यान वाहनांची लांबच लांब रांग लागल्याने वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी विनाकारण फिरणार्यांपैकी 50 जणांची अँटीजन टेस्ट केली यात एक व्यक्तीचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलिसांनी देखील कडक अमंलबजावणी सुरु केली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी येणार्या प्रत्येक गाडयांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच विनाकारण आलेल्या प्रत्येक गाडीची चौकशी करुन 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. पोयनाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहूल अतिग्रे यांच्या नेतृत्वाखाली येणार्या प्रत्येक वाहनाची आज कसून तपासणी केली जात होती. पोयनाड पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तपासणी विकेंडमुळे मौजमस्ती, फिरायला आल्याचे निदर्शनास येताच त्या वाहनचालकाकडून दंड वसूल करीत त्यांना आल्या पावली परत जाण्यास भाग पाडले जात होते. यामळे पर्यटकांचा चांगलाच हिरेमोड होत होता. त्याचप्रमाणे या मार्गावरुन प्रवास करणार्या सर्वच वाहनचालकांचा या मोहिमेचा फटका बसला. यादरम्यान शहाबाज ते पेझारी चेकपोस्ट दरम्यान लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. मात्र, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई योग्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त करत स्वागत केले.
या कारवाई दरम्यान, पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मदीतने 50 जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहूल अतिग्रे यांनी दिली. तर विनामास्क फिरणार्यांकडून 7 हजार 800 रुपयांचा दंड गोळा करण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी विनाकारण फिरण्यासाठी येणार्या पर्यटकांना परत पाठविण्यात येत आहे. पुढील आठवडयापर्यंत अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर न फिरता घरीच थांबावे.
राहूल अतिग्रे, पोलिस सहायक निरीक्षक, पोयनाड पोलिस ठाणे