। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कर्नाटकमधील यादगीरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये आई-वडील, तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. फळबागांचं पिक घेण्यास अपयश आल्याने जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं देखील वाढलं होतं, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यात पिक घेण्यास अपयश आल्याने कर्ज कसं भरणार? असा प्रश्न त्यांना पडला होता. अखेर शेततळ्यात उडी घेऊन कुटुंबाने आपलं जीवन कायमचं संपवलं. कुटुंबाने टोकाचं पाऊल उचलल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावातून सहा जणांचे मृतदेह काढले. तसेच शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तलावातून मृतदेह काढत असताना बघ्यांची गर्दी जमा झाली होती.
भीमराव सुरापुरा, त्यांची पत्नी शांतम्मा, मुलगा शिवराज आणि मुली सुमित्रा, श्रीदेवी, लक्ष्मी अशी त्यांची नावं आहे. ही घटना सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. मात्र त्यांच्यापैकी काही जणांचे मृतदेह वर तरंगताना काही जणांनी पाहिल्यानंतर घटनेची माहिती मिळाली, असं पोलिसांनी सांगितलं. सहा जणांनी यादगीरमधील तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. त्यांनी त्यांच्या शेतात फळबाग फुलवली होती. मात्र त्यांना त्यात यश न आल्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पोलीस अधिकार्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.